सहज



आलेल्या क्षणाला सहज सामोरं जाणं हे तत्त्व झेन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक मानलं जातं. या तत्त्वाचं आचरण करण्यासाठी शिकागोस्थित लेखक धनंजय जोशी यांनी भारतातून, थायलंडमधून आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्सना (विपश्यना) आणि झेन मेडिटेशन या दोन्ही अध्यात्मपरंपरांची प्रदीर्घ काळ साधना केली. एवढंच नव्हे तर त्यांनी झेन तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून ललितशैलीत अनुभवकथन लिहिलं. त्याचंच हे पुस्तक म्हणजे ‘सहज’.

रोजच्या जगण्यातल्या नेहमीच्या अनुभवांना झेन कथा, झेन गुरूंच्या आठवणी किंवा प्रसंग यांची जोड देऊन जोशी लीलया झेन तत्त्वज्ञानातली मूलतत्त्वं आपल्याला त्यांच्या या लहानशा लेखांमधून सांगून जातात. विशेष म्हणजे ती सांगत असताना त्यांचा सूर उपदेशकाचा नसतो. तो सहज, पण काहीतरी महत्त्वाचं सांगून जाणारा असतो.

एखाद्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने त्याला आकळलेली शहाणीव जाता जाता आपल्याला सांगून जावी, असा अनुभव देणारं पुस्तक… ‘सहज’…


250.00 Add to cart

योग एक कल्पतरू

बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.

योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. हे सर्व कसे घडू शकते, याचाच विचार योगमहर्षी श्री.बी.के.एस.अय्यंगार यांनी या पुस्तकात विविध अंगांनी केला आहे. याच एका साधनेत आपले अवघे आयुष्य व्यतीत करून श्री. अय्यंगार यांनी सिध्द केलेले हे पुस्तक म्हणजे जणू ‘योग-नवनीत’च होय. योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग दिग्दर्शित करणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक.


175.00 Add to cart

शांती योग

योग साधनेची प्राथमिक,माध्यमिक आणि प्रगत वाटचाल


गीता अय्यंगार यांना योगशास्त्राचा मौल्यवान वारसा, त्यांचे वडील विश्वविख्यात योगतज्ज्ञ श्री. बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडून मिळाला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार हे आपल्या विशाल योगतत्त्वज्ञानाच्या कलात्मक आविष्कारासाठी सर्वश्रुत आहेत. गीता अय्यंगार यांचा योगाभ्यासाचा प्रारंभ बालपणापासूनच झाला. १९६२ पासून त्या ‘योग’ हा विषय शिकवत आहेत. त्या ‘तत्त्वज्ञान’ व ‘आयुर्वेद’ या विषयातील पदवीधर आहेत. त्यांच्या योगविषयक ज्ञानाला मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोडीमुळे, त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करू शकतात. ‘रमामणि अय्यंगार मेमोरियल इन्स्टिट्युट’च्या त्या एक चालक होत्या. गीता अय्यंगार यांनी योगविषयाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी भारतात आणि विदेशात सर्वदूर प्रवास केलेला आहे. त्यांची या विषयावरील पुस्तकंही जगन्मान्य आहेत. या क्षेत्रात ज्या काही फार थोड्या स्त्रिया काम करू शकल्या त्या ‘योगशास्त्र’ विषयासंदर्भात त्यांचे नाव अतिशय आदराने व मानाने घेतलं जातं. त्यांच्या ‘स्त्रियांसाठी योग-एक वरदान’ या पुस्तकाच्या मूळ इंग्रजी आवृत्तीचे, या पूर्वी युरोपातील सहा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. स्वत: एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आव्हानं, शारीरिक व मानसिक चढउतार हे त्या उत्तमरीत्या जाणू शकतात. स्त्रियांविषयी आंतरिक तळमळ असल्यामुळेच त्यांनी हे पुस्तक अतिशय तपशिलात लिहिलं आहे.

‘योग’ हा विषय तसा अवघडच. कारण ते एक दार्शनिक तत्त्वज्ञान आहे. यामध्ये बुद्धीला पटलेले तत्त्वज्ञान स्वअनुभवानेच सिद्ध करायचे असते. प्रयोग करायचा असतो तो स्वत: वरच; तेही आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी… हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भीती मनात बाळगण्याचे कारण नाही. योगामुळे जीवन जगण्या-अनुभवण्याची कला अवगत होऊ शकते तसेच जीवनविषयक तत्त्वज्ञानाची ओळख होऊ शकते. म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला ‘योग’ दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय; परंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरुजींनी (योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार) सोप्या शब्दांत मांडणी करून ठेवली आहे. त्याचेच विवेचन गीता अय्यंगार यांनी या पुस्तकात समर्थपणे केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे, त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते. या पुस्तकाचे वाचन, मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल.


300.00 Read more