भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा
इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता
प्रफुल्ल बिडवई
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
लोकशाही सुदृढ व्हायची तर जनसामान्यांना देशात प्रदीर्घ काळ टिकून असलेल्या लोकाभिमुख विचारप्रवाहांची, चळवळींची सर्वांगीण माहिती असणं आवश्यक असतं…
या पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक त्याविषयी केवळ समग्र माहिती देणारं नाही, तर त्याबद्दलचं वाचकांना सर्वांगीण आकलन साध्य व्हावं, या कळकळीने लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ, या पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी केवळ डाव्या संसदीय पक्षांच्या निवडणुकीतील (लोकसभा, विधानसभा) कामगिरीचा आढावा घेतलेला नाही; तर त्या त्या वेळी विविध पुरोगामी जनसंघटनांच्या चळवळींनी वेâलेली कामगिरी, अशा निवडणुकींमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाच होते, विविध राजकीय शक्तींचं आणि समाजातील घटकांचं संघटन कसं केलं गेलं (डावे, मध्यममार्गी आणि प्रस्थापित उजवे पक्ष, सर्वांद्वारे), तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, कोणत्या आंतरराष्ट्रीय, साम्राज्यवादी शक्ती सशक्त होत्या वा देशातील कोणते वर्ग जोरावर होते याचे तपशील दिलेले आहेत आणि त्यामुळेच देशातील वेळोवेळीच्या राजकारणाचं खरं स्वरूप समजून घेण्यास अंतर्दृष्टी लाभते. तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ स्पष्ट होऊन चळवळीच्या वाटचालीचं, चढ-उताराचं केवळ समग्र नाही, तर सर्वांगीण आकलन साध्य होतं.