वा! म्हणताना

डॉ. आशुतोष जावडेकर


‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’

– डॉ. आशुतोष जावडेकर

साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…


250.00 Add to cart

भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून

महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचं केलेलं नेमकं विवेचन


महात्मा गांधी

अनुवाद : भगवान दातार


‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवद्गीता’! भगवद्गीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.

पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रूपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.

अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन – भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून


300.00 Add to cart

मर्डर इन माहीम


जेरी पिंटो
अनुवाद : प्रणव सखदेव


माटुंगा रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये सापडलेला एका तरुणाचा मृतदेह आणि तिथून सुरू झालेला शोधाचा एक प्रवास… क्षणोक्षणी वेगळ्याच व्यक्तींकडे वळणारी संशयाची सुई आणि या प्रवासात सतत येणारी अनपेक्षित वळणं !

इन्स्पेक्टर झेंडे आणि निवृत्त पत्रकार पीटर डिसूझा यांच्या या शोधप्रवासात उलगडते – ‘मुंबई’ या मायानगरीच्या पोटात दडलेली एक वेगळीच दुनिया…यातलं ‘गे’ व्यक्तींचं जग, त्याला असणारी अनेक अस्तरं ! इथली अगतिकता…शत्रुत्व…स्पर्धा… मैत्री…क्रौर्य…अशा अनेक भावनांचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते.

संवेदनशील पत्रकार आणि प्रतिभावान लेखक जेरी पिंटो यांचं मानवी नातेसंबंधांतल्या अनेक कंगोऱ्यांचा वेध घेणारं आणि ‘अस्वस्थ’ मुंबईचं वास्तव दर्शन घडवत एका खुनाच्या मुळाशी जाणारं… मर्डर इन माहीम !



250.00 Add to cart

वाचा जाणा करा

९ पुस्तकांचा संच


कविता महाजन


सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी

नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट

यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी

आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती

इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत.

मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून

प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे.

मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या

आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!



450.00 Add to cart

कोरडी शेतं… ओले डोळे

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा… अंधारात असलेली एक सामाजिक समस्या


दीप्ती राऊत


महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत… या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?’ ही बाजूही तितकीच भीषण आहे.

अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्ध्याही त्यांना भेटल्या.

सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं…ओले डोळे !


160.00 Add to cart

बबडू बँकेत

मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख


विजय तांबे


बँकेचे व्यवहार कसे चालतात?

बँकेत खाती किती प्रकारची असतात?

बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?

मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?

एटीएममधून पैसे कसे काढायचे?

डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?

चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?

चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?

NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?

मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत

असे अनेक प्रश्न पडत असतात.

दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या

लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात

मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,

रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.

मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.



100.00 Add to cart

माझं कुटुंब, माझी गुंतवणूक

स्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन


वीरेंद्र ताटके


आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!

गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…

एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च

अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.

बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.

मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !



175.00 Add to cart

सूळकाटा


ल.सि. जाधव


प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःख, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाNया दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर…
हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं.
सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा !


250.00 Add to cart

माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन


नसरीन मुन्नी कबीर

अनुवाद : प्रणव सखदेव


तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.


295.00 Add to cart

युद्धखोर अमेरिका


अतुल कहाते


देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं…
एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश…
मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान…
व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार…
विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण…
जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील
— कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली,
कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला,
तर कधी थेट आक्रमणंच केली…
सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा
‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’
अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत.
त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून
परखड चिकित्सा केली आहे.
‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’,
‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’
अशी ओळख असलेल्या अमेरिकेची
आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज…
‘युद्धखोर अमेरिका’!



425.00 Add to cart

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर


[taxonomy_list name=”product_author” include=”583″]


अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!


160.00 Add to cart

तुमच्या आमच्या लेकी

त्यांचं आरोग्य…त्यांच्या समस्या मनमोकळ्या संवादातून सहज-सोपं समुपदेशन


डॉ. लिली जोशी


आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो.
त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत?
अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो.
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो…आणि `डॉक्टर’ लिली जोशी यांच्याकडे येणार्‍या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई’ होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो.
वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन
लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात…!
डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील !
आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्‍या, धडपडणार्‍या, अडखळणार्‍या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्‍या या…तुमच्या-आमच्या लेकी!


180.00 Add to cart

प्रज्ञावंत संच

मानवी जीवन समृद्ध करणारे


अरविंद वैद्य


गेल्या काही शतकांत असे अनेक `प्रज्ञावंत’ होऊन गेले
ज्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळे विविध क्षेत्रांचा विविधांगी विकास होऊन
मानवी जीवन अनेक अंगाने समृद्ध होत गेलं.
अशा काही भारतीय आणि परदेशी महान व्यक्तिमत्त्वांचं योगदान सांगणारी,
त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी ही व्यक्तिचित्रणं…अर्थात `प्रज्ञावंत १ व २!’


450.00 Add to cart

बातमीमागची बातमी

खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य

जयप्रकाश प्रधान

 


हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’



200.00 Add to cart

रस्किन बाँड संच

भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता


रस्किन बाँड

अनुवाद : नीलिमा भावे , रमा हर्डीकर सखदेव


सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.
त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,
त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या
कथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !
तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल…
तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!


1,050.00 Add to cart

योगदीपिका

जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद


बी.के.एस. अय्यंगार
अनुवाद : राम पटवर्धन


योगसाधकांसाठी हे पुस्तक म्हणजे योगविद्येची जणू गीताच !
१९३६पासून बी.के.एस. अय्यंगार यांनी जनसामान्यांना योगविद्येचे धडे दिले. जगभर प्रवास करून त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगविद्येचा विविध देशात प्रसार केला. या पुस्तकात त्यांनी ‘योग’ म्हणजे काय, त्या मागचं तत्त्वज्ञान कोणतं व त्याची व्याप्ती किती याविषयी समर्पक चर्चा केली आहे.
पुस्तकात आसनांविषयी सखोल विवेचन करून त्या त्या आसनांची छायाचित्रं दिली आहेत. एवूâण २०० आसनं आणि बंध व १४ श्वसनाचे प्रकार (प्राणायाम) विस्तृतपणे दिले आहेत. पुस्तकात त्या त्या जागी दिलेल्या ६०० छायाचित्रांच्या आधारे तुम्ही कोणतंही आसन शिक्षकाच्या मदतीशिवाय बिनधोक करू शकता.
याशिवाय योग, नाडी, चक्र आणि कुंडलिनी या योगशास्त्रातील महत्त्वाच्या संज्ञांच्या व्याख्या देऊन त्यावर थोडक्यात भाष्यही केलं आहे. परिशिष्टामध्ये विशिष्ट आजारांवर प्रभावी ठरणार्‍या आसनांची यादीच दिली आहे. तसेच योगविद्या आत्मसात करण्यामध्ये विशेष रुची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ३०० आठवड्यांचा एक प्रदीर्घ कोर्सच आखून दिला आहे. या कोर्सची विभागणी तीन भागांमध्ये केली आहे.
प्रारंभी सोप्या आसनांपासून सुरुवात करत थोडी अवघड आसनं आणि नंतर कठीण आसनं टप्प्याटप्प्याने कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक… योगदीपिका !


<


500.00 Add to cart