वाचा जाणा करा संच
प्रतिभावान कवी, कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बहुप्रसवा लेखिका कविता महाजन यांनी सर्जनशील लेखनाबरोबर अनुवाद तसंच संपादन क्षेत्रात भरीव काम केलं आहे. त्यांनी मुलांसाठीही गोष्टीची पुस्तकं लिहिली आहेत.
त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेडला झालं आणि त्यानंतर त्यांनी औरंगाबाद इथे कलाविषयक शिक्षण केलं. त्यांनी मराठी साहित्यात एम.ए.देखील केलं. कवितेपासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. 'ब्र', 'भिन्न' या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या तसंच त्यांनी केलेल्या इस्मत चुगताई यांच्या 'रजई' या लघुकथासंग्रहाच्या अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार, तसेच इतर अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले.
`इतकी कामं करायला मला काही दहा हात नाहीयेत.
सगळे जण चटाचटा पाय उचला आणि या माझ्या मदतीला.”
आई कधीकधी म्हणते. मग आई, बाबा, आजी, आजोबा
आणि मैत्रेयी अशा पाच जणांचे मिळून
खरोखरच दहा हात होतात आणि सगळी कामं पटापटा होतात.
पाय जास्त काम करतात की हात जास्त कामं करतात?
हातच जास्त कामं करत असणार!
हात लिहितात, चित्रं काढतात, वाद्यं वाजवतात,
स्वयंपाक करतात, घर स्वच्छ करतात, ऑपरेशन करतात,
झाडांना पाणी घालतात… बापरे… कित्ती कामं!
आणि पाय चालतात, पळतात, फुटबॉल खेळतात,
नाचतात, लाथा मारतात… म्हणजे पायही महत्त्वाचे आहेतच.
पण आई जसं दहा हात हवेत म्हणते तसं
कधी दहा पाय हवेत असं मात्र कधीच का नाही म्हणत ?