गीता अय्यंगार

गीता अय्यंगार यांना योगशास्त्राचा मौल्यवान वारसा, त्यांचे वडील विश्वविख्यात योगतज्ज्ञ श्री. बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडून मिळाला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार हे आपल्या विशाल योगतत्त्वज्ञानाच्या कलात्मक आविष्कारासाठी सर्वश्रुत आहेत.
गीता अय्यंगार यांचा योगाभ्यासाचा प्रारंभ बालपणापासूनच झाला. १९६२ पासून त्या ‘योग’ हा विषय शिकवत आहेत. त्या ‘तत्त्वज्ञान’ व ‘आयुर्वेद’ या विषयातील पदवीधर आहेत. त्यांच्या योगविषयक ज्ञानाला मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोडीमुळे, त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करू शकतात. ‘रमामणि अय्यंगार मेमोरियल इन्स्टिट्युट’च्या त्या एक चालक होत्या. गीता अय्यंगार यांनी योगविषयाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी भारतात आणि विदेशात सर्वदूर प्रवास केलेला आहे. त्यांची या विषयावरील पुस्तकंही जगन्मान्य आहेत. या क्षेत्रात ज्या काही फार थोड्या स्त्रिया काम करू शकल्या त्या ‘योगशास्त्र’ विषयासंदर्भात त्यांचे नाव अतिशय आदराने व मानाने घेतलं जातं.
त्यांच्या ‘स्त्रियांसाठी योग-एक वरदान’ या पुस्तकाच्या मूळ इंग्रजी आवृत्तीचे, या पूर्वी युरोपातील सहा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. स्वत: एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आव्हानं, शारीरिक व मानसिक चढउतार हे त्या उत्तमरीत्या जाणू शकतात. स्त्रियांविषयी आंतरिक तळमळ असल्यामुळेच त्यांनी हे पुस्तक अतिशय तपशिलात लिहिलं आहे.

लेखकाची पुस्तकं

योगोपचार

योगमहती अधोरेखित करत विविध आरोग्यसमस्या निवारणासाठी उपयुक्त मार्गदर्शन


शब्दांकन : गीता अय्यंगार


योग म्हणजे जीवन जगण्याची कला. योगाची अनेक रुपं व पैलू आपल्या जीवनाला समृद्ध करतात. त्यात जगण्यातली सहजता, मोकळेपणा, आल्हाददायकता, सचोटी आणि मनोविकास या पैलूंचा समावेश तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचा पैलू योगाबरोबर जोडला गेला आहे, तो म्हणजे आरोग्य!

वयानुसार उद्भवणारे शारीरिक, मानसिक विकार आणि जन्मतःच असणारे दोष, अशा दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. खरं म्हटलं तर योग ही जणू नैसर्गिक देणगीच मानवजातीला लाभलेली आहे. या दृष्टिकोनातून योगमहती सांगता सांगता लेखकाने…

■ लहानपणापासूनच स्वतःला घडवण्याचं तंत्र

■ प्रौढवयात येणारं अग्निमांद्य

■ उच्च रक्तदाब

■ मधुमेह

■ उतारवयात येणारे हृदयरोग

■ त्वचेचे विकार

■ स्त्रियांच्या आरोग्यसमस्या

… अशा अनेक आरोग्यसमस्यांवर प्रचलित योगासनांचे उपचार या पुस्तकात सुचवले आहेत. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील काही साधनांचा उपयोग करून अथवा आधार घेऊन योग करण्याची क्रिया आणि कृतीही दिल्याने शारीरिक मर्यादा असणाऱ्यांनाही हे योगोपचार अतिशय सुलभतेने आणि उत्तमरीत्या साधता येतील. योगाला आयुष्य वाहिलेल्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी मराठी माणसाच्या सोयीसाठी मराठीत साकारलेलं पुस्तक… योगोपचार !


500.00 Add to cart

शांती योग

योग साधनेची प्राथमिक,माध्यमिक आणि प्रगत वाटचाल


गीता अय्यंगार


‘योग’ हा विषय तसा अवघडच. कारण ते एक दार्शनिक तत्त्वज्ञान आहे. यामध्ये बुद्धीला पटलेले तत्त्वज्ञान स्वअनुभवानेच सिद्ध करायचे असते. प्रयोग करायचा असतो तो स्वत: वरच; तेही आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी… हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भीती मनात बाळगण्याचे कारण नाही. योगामुळे जीवन जगण्या-अनुभवण्याची कला अवगत होऊ शकते तसेच जीवनविषयक तत्त्वज्ञानाची ओळख होऊ शकते. म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला ‘योग’ दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय; परंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरुजींनी (योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार) सोप्या शब्दांत मांडणी करून ठेवली आहे. त्याचेच विवेचन गीता अय्यंगार यांनी या पुस्तकात समर्थपणे केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे, त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते. या पुस्तकाचे वाचन, मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल.


375.00 Add to cart

स्त्रियांसाठी योग…एक वरदान

स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग …त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन

गीता अय्यंगार


या पुस्तकात विशेषत: स्त्रियांना उपयुक्त ठरतील असे योगाविषयीचे व आसनांविषयीचे बारकावे सादर केले आहेत. यात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यानविषयक माहिती तंत्रासहित दिली आहे. याचा फायदा शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यास होईल त्याचप्रमाणे विविध व्याधींवर उपचार म्हणूनही होईल. योगसाधनेची दिलेली क्रमवार पध्दती हे या पुस्तकाचं वैशिष्टय होय. तसेच योग या विषयाची मांडणी, योगाच्या प्रायोगिक अंगाची विषयवार मांडणी, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ठरविलेला मार्ग या बाबतीत लेखिकेने पुस्तकात सखोल व सचित्र मार्गदर्शन केलं आहे.
पुस्तकाची ठळक वैशिष्टये
0 दृढशास्त्रीय बैठक
0 अभ्यासाची क्रमवार मांडणी
0 मूलभूत दृष्टी देऊन योगतत्त्वाचा
सर्वांगीण परामर्श
0 सहजपणे आत्मसात करता येण्याजोगी आसने, प्राणायाम, ध्यान यांचे तंत्र
0 क्षमतेनुसार दिलेले विविध पर्याय
योगविद्या गुरूशिवाय साध्य होत नाही, पण या पुस्तकाचा आपण जर मनापासून अभ्यास केला तर जवळजवळ प्रत्यक्ष गुरूकडून मिळेल इतकं समग्र आणि सखोल ज्ञान यातून मिळतं. यातील माहिती परिपूर्ण व अचूक आहे.



500.00 Add to cart