पदार्थ रुचकर होण्यासाठी व त्यातील पोषणमूल्य जपण्यासाठीचे शास्त्रीय धडे
डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे.
‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
स्वयंपाक म्हणजे कला आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ घालून केलेली कृती, हे एकदा पटलं की, त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतात आणि विविधप्रकारे नावीन्यही आणता येतं. थोडा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर, एखादा पदार्थ जास्तीतजास्त चविष्ट कसा होईल याचा विचार करता येईल आणि एखादा पदार्थ बिघडण्यामागचं कारणही समजून येईल. डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाद्वारे अत्यंत सोप्या भाषेत स्वयंपाकघराची ‘शास्त्रीय सफर’ घडवून आणली आहे.
पुस्तकात तीन विभाग आहेत…
पहिल्या भागात… जेवणातील पदार्थ किंवा सणासुदीला बनवले जाणारे पदार्थ यांच्या घडण्या-बिघडण्यातलं गुपित, भाज्या करताना घ्यायची काळजी, स्वयंपाक करताना होणाऱ्या चुका, बिघडलेले पदार्थ सुधारता येतील अशा युक्त्या
दुसऱ्या भागात… रोजच्या आहारातल्या विशिष्ट ऋतुत मिळणाऱ्या आणि महत्त्वाच्या अशा भाज्यांचं पोषणमूल्य, त्यांचं आहारातील महत्त्व
तिसऱ्या भागात… फळांचं आहारातील महत्त्व, फळांमधील पोषणमूल्यं, कोणत्या वयोगटाने व विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी कोणती फळं खावीत याबद्दल मार्गदर्शन
अगदी रोजचा वरण-भात करायचा म्हटला तरी तो रोज सारखाच होईल याची शाश्वती नसते. अशा वेळी थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून स्वयंपाक केल्यास रुची, पोषणमूल्य, चुकांची दुरुस्ती असं सर्व काही साधता येईल. ‘आधुनिक युगातील सुगरण’ होण्यासाठी शास्त्रीय धडे देणारी… डॉ. वर्षा जोशींची स्वयंपाकशाळा!