हिराबाई बडोदेकर
गायनकलेतील तारषड्ज
डॉ. शुभदा कुलकर्णी
ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची.
सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर.
डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल !
– डॉ. चैतन्य कुंटे