रॉयल बेंगॉलचे रहस्य
₹95.00
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे या विश्वकीर्तीवंत दिग्दर्शकाने पथेर पांचाली, चारुलता, अरण्येर दिनरात्री, शोनार केल्ला आणि जलसाघर हे गाजलेले चित्रपट बनविले. सत्यजित रे यांचा १९२१—१९९२ हा कालखंड होता.
१९९२ साली अॅकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅन्ड सायन्सने त्यांना जीवनगौरव म्हणून ‘ऑस्कर’ पुरस्कार दिला. त्याच वर्षी भारत सरकारनं ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला.
सत्यजित रे हे एक नामवंत लेखकही होते. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या लघु कथा, लघु कादंबऱ्या, कविता आणि लेख मुलांच्या ‘संदेश’ या मासिकात १९६१ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि तेव्हापासून ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांपैकी ‘गुप्तहेर फेलूदा’ व ‘शास्त्रज्ञ प्रोफेसर शंकू’ या साहित्यात अजरामर झाल्या आहेत व बंगाली जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत.
अनुवाद :
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले.
सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.
प्रख्यात शिकारी व वन्यजीवन लेखक महितोष सिन्हा रॉय यांच्या प्रासादात फेलूदा त्यांना भेटायला गेला असता पूर्वजांचा मौल्यवान खजिना कुठे दडवला आहे याचं सांकेतिक भाषेतील कोड त्याला दिलं जातं, परंतु त्याची उकल करण्यापूर्वीच सिन्हा रॉय यांच्या तरुण सचिवाचं प्रेत जंगलात सापडतं. वाघानं ते छिन्नविछिन्न केलेलं असतं. फेलूदाला तपासकामात सिन्हा रॉय यांच्या घराण्याची वादग्रस्त गुपितं उलगडत जातात आणि फेलूदाची जंगलात गाठ पडते एका रॉयल बेंगॉल नरभक्षक वाघाशी. साहस, शिकार व घनदाट जंगलाइतकेच घनगर्द रहस्य यांचं अदभुत मिश्रण असलेली ही चित्तथरारक कादंबरी.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे सहावे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.