संग्राम गायकवाड भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी. सध्या पुण्यामध्ये आयकर आयुक्त म्हणून कार्यरत. सीओइपीमधून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतल्यानंतर थोड्या कालावधीसाठी स्वयंसेवी संस्थेमध्ये काम. त्यानंतर मुंबई, कोल्हापूर, धारवाड, दावणगेरे येथे आयकर विभागांतर्गत विविध पदावर नेमणूक. कर प्रशासनातील सुधारणा, धोरणनिर्मितीच्या प्रक्रिया, अंमलबजावणीच्या रचनांमधील सुधारणा हे अभ्यासाचे विषय.
विविध नियतकालिकं आणि दैनिकांमधून कविता, कथा आणि लेख प्रकाशित. 'सिलेक्टेड एसेज ऑफ डॉक्टर एस. एस. कलबाग या पुस्तकाचं संपादन. 'विज्ञानाश्रम' या विषयावरील डॉक्युमेंटरीच्या निर्मितीमध्ये सहभाग. साहित्य, समाजशास्त्र, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, भटकंती, पक्षीनिरीक्षण, इत्यादी विषयांची आवड..
'आटपाट देशातल्या गोष्टी' ही कादंबरी २०१८ साली प्रकाशित. या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा 'दिवदत्त पाटील पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'वा. म. जोशी स्मृती पुरस्कार' आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 'श्री. ना. पेंडसे पुरस्कार' प्राप्त.
या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.
एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.
डॉ. नीतीन रिंढे
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Reviews
There are no reviews yet.