आर.के. नारायण
आर.के. नारायण यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचं बालपण चेन्नई येथे त्यांच्या आजोळी व्यतीत झालं. त्यांच्या वडिलांची ‘महाराजा हायस्कुल’, म्हैसूर येथे बदली झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह म्हैसूर येथे वास्तव्यास आले.
त्यांनी लेखनाची सुरुवात त्यांच्या १९३५ सालच्या ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ या पुस्तकाने केली. ‘मालगुडी’ या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून चितारणं ही त्यांची खासियत !
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘गाइड’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार आणि रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरतर्फे दिलं जाणारं ए.सी. बेन्सन मेडल प्राप्त झालं. अनेक विख्यात विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली. १९६४ साली त्यांना पद्मभूषण तर २००० साली पद्मविभूषण सन्मान प्राप्त झाला. १९८९मध्ये त्यांना राज्यसभेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं. या महान लेखकाचा १३ मे २००१ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी मृत्यू झाला.