सॉक्रेटिस कधी मरत नसतो
माधव कौशिक
भावानुवाद :रवींद्र शोभणे
हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.
कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो.
मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे.
मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….