ले.जन. के.एस. ब्रार
लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार – निवृत्त; परम विशिष्ट सेवा मेडल–PVSM, अति विशिष्ट सेवा मेडल–AVSM, आणि वीरचक्र विजेते, यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी १९३४ साली लाहोरमध्ये झाला. ‘डून स्कुल’मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी आपल्या प्रदीर्घ लष्करी सेवेत अनेक पदांवरून नेतृत्व केलं. त्यांनी इन्फन्ट्री आणि स्वतंत्र रणगाडा ब्रिगेडचं नेतृत्व केलं. इन्फन्ट्री डिव्हिजन आणि कोअर कमांडर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचेही काही काळ ते प्रमुख होते. ३० सप्टेंबर १९९२ रोजी लष्कराच्या इस्टर्न कमांडचे ते प्रमुख म्हणून निवृत्त झाले. ऑस्ट्रेलियन स्टाफ कॉलेज आणि युनायटेड स्टेटस वॉर कॉलेजमधून त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. शौर्य आणि विशेष सेवेबद्दलचे अनेक उच्च पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातल्या जवळपास सर्वच घटनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.