जयप्रकाश प्रधान

‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश प्रधान २८ वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रांतील त्यांची अनेक बातमीपत्रं साऱ्या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली. त्यावर आधारित ‘बातमीमागची बातमी’ हे त्यांचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं आहे. ‘पर्यटन’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना भेटी देऊन, तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा ‘१२ दिवसांत १० देश’ या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल किंवा क्रुझ कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना वेगळ्याच जगाचं दर्शन घडलं. ‘अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे,' या इच्छेमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेली नाही.