हरी कृष्ण बाखरू
एक उत्तम निसर्गोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून डॉ. हरी कृष्ण बाखरू यांची संपूर्ण देशभर ख्याती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
डॉ. बाखरू यांनी ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणून डिप्लोमा मिळवलेला आहे. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती या विषयांवर सखोल अभ्यास करून त्यांनी इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ‘गुणकारी आहार' या पुस्तकाला ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेतर्फे ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे.
डॉ. बाखरू यांनी लखनौ विद्यापीठातून इतिहास या विषयात १९४९मध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ३५ वर्षं भारतीय रेल्वेच्या सेवेत राहून मुख्य संपर्काधिकारी म्हणून इ.स. १९८४मध्ये ते निवृत्त झाले. डॉ. बाखरू यांनी ‘डी.एच. बाखरू फाऊंडेशन’ या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टतर्फे गरीब व गरजू लोकांना औषधोपचार केला जातो.