डॉ. विजया फडणीस
डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे.
त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.