ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर

ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर माणसांतील जगण्याच्या प्रेरणांचा शोध
घेणं हा ज्ञानेश्वरचा आवडता छंद. या छंदासाठी तो हरतऱ्हेच्या माणसांना भेटायला उत्सुक असतो. त्यांचं जगणं समजून घ्यायला त्याला आवडतं. निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडी, जंगल यांच्यातही तो रमतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो. वेगवेगळ्या अनुभवांच्या शोधात तो गावोगावी फिरत असतो. या फिरण्यात त्याला जे सापडतं ते त्याला कधी विसरून जावंसं वाटतं तर कधी गोष्ट रूपाने मांडावंसं वाटतं. स्वत:चं जगणं, सोबतच्यांचं जगणं आणि अवतीभवती घडणारे प्रसंग हे सर्व म्हणजेच त्याची पहिली कादंबरी - 'यसन' असं त्याचं म्हणणं. जगतांना मनात उद्भवणारे विचारच त्याला लिहिण्यास प्रवृत्त करतात. स्वत:च्या जगण्यासोबत समूह म्हणून जगण्यातला माणसाचा तळही तो तपासत असतो, त्याच्या नोंदी करत असतो. विविध मानवी समूहांच्या नोंदी करतांना तो खूप काही शिकत असतो, असं त्याला वाटतं. त्या शिकण्यातूनच 'यसन', 'लॉकडाउन', 'कूस' आणि 'चंबूगबाळं' या कादंबऱ्या तयार झाल्या. या कादंबऱ्यांसोबत अनेक एकांकिका, नाटकं, कथा त्याने लिहिल्या आहेत. त्याशिवाय शरद पवार फेलोशिप, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईचा युवा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा श्री. ना. पेंडसे प्रथम प्रकाशन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर पुरस्कार, कुंडलकृष्णाई प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवर संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार त्याला त्याच्या साहित्यासाठी मिळाले आहेत.

लेखकाची पुस्तकं

SaleFeatured

कूस


ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर


ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. दोन जणांचा मिळूनच ‘कोयता’ होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दुःसह मार्ग असंख्य महिलांनी असाहायपणे स्वीकारला. या महिलांनी जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण ‘कूस’ या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते…

-आसाराम लोमटे, सुप्रसिद्ध साहित्यिक

ज्ञानेश्वर जाधवर यांनी पिढ्या न् पिढ्या कष्ट करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांचं दैनंदिन जीवन, त्यांना करावा लागणारा संघर्ष, स्थानिक राजकारणी, मुकादम मजुरांमधील संवाद, कोपीमध्ये झालेलं बाळंतपण, जगण्याची प्रत, निवडणुका, अलीकडच्या काळात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना…. असा एक व्यापक पट ‘कस’ या कादंबरीत त्यांनी शब्दबद्ध केला आहे. ऊस तोडणीच्या कामात खाडा झाला की आर्थिक नुकसान होतं आणि पतलेली उचल फिटत नाही त्यामुळे नवऱ्याची मारझोड सुरू होते आणि अंतिमतः त्याची परिणती गर्भाशय काढण्यापर्यंत जाते! शहरी पांढरपेशी माणसाला विचार करायला लावणारं हे सत्य कादंबरीतून वाचताना अंगावर अक्षरशः शहारे आणतं. २१व्या शतकात समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जात असताना ऊस तोडणी मजुरांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आपण अजूनही किती मागे आहोत तेच दर्शवते.

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य


 


Original price was: ₹360.00.Current price is: ₹270.00. Add to cart