लढा टाकलेल्या स्त्रियांचा
परित्यक्ता आंदोलनाचा वेध आणि स्त्री-पुरुष समतेचा शोध
अॅड. निशा शिवूरकर
नवर्याने सोडलेल्या बायकांचा प्रश्न आपल्या समाजात खूप जुना आहे. अगदी पुराणकाळापासून सीता, अहिल्या यांसारख्या परित्यक्तांची उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत. आजही आपल्या समाजात परित्यक्तांसाठी `टाकलेली’, `सोडलेली’, `बैठीली’ असे अत्यंत अपमानकारक शब्द सहजपणे वापरले जातात.
घटस्फोट न देता-घेता इच्छेविरुद्ध हाकललेली विवाहित स्त्री म्हणजे `परित्यक्ता’. `ज्याची-त्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब’ असं म्हणून टाळला जाणारा हा प्रश्न वास्तविक एक गंभीर सामाजिक समस्या आहे. अलीकडील काळात हा प्रश्न ऐरणीवर आणला तो समता आंदोलनाने. या आंदोलनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्यांसाठी दिलेल्या लढ्यांचा विविधांगी आढावा या पुस्तकात घेतला आहे. त्याशिवाय परित्यक्तांच्या बोलक्या कहाण्या, परित्यक्ता होण्यामागची कारणं, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक असे पोषक विचार आणि रचनात्मक व संघर्षात्मक कार्यामधून टिपलेल्या नोंदी या सर्वाचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळेल.
पुस्तकाच्या लेखिका अॅड. निशा शिवूरकर या हाडाच्या कार्यकर्त्या असून त्यांनी या प्रश्नावर गेली अनेक वर्षं अनेक स्तरांवर झपाटल्यागत काम केलं आहे. या प्रश्नाची धग जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात व्यापक असा सहानुभाव आहे. माणूस म्हणून आपल्या जाणिवा रुंदावणारं हे पुस्तक शिवूरकरांनी ओघवत्या आणि थेट शैलीमध्ये लिहिलं आहे.
सामाजिक भान देणारा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज… अर्थात लढा `टाकलेल्या’ स्त्रियांचा