विजय नाईक
विजय नाईक यांचा जन्म १ जुलै, १९४५ रोजी अहमदनगर येथे झाला असून १९६७ साला पासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य आहे. सध्या ते ‘सकाळ पेपर्स’चे सल्लागार-संपादक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ‘दै. गोमंतक’ व त्यानंतर ‘सकाळ’चे दिल्लीतील वार्ताहर व ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजकीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन करण्यासाठी अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. भारतीय राजकारण, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी व शिष्टाई या विषयासंबंधी त्यांचं विशेष अध्ययन असून त्यावर त्याचं लिखाण सुरू असतं. १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धात ‘युद्धवार्ताहर’ म्हणून त्यांनी वार्तांकन केलं आहे. तसंच, त्यांनी ‘आयपीकेएफ’च्या श्रीलंकेतील तमिळ वाघांविरुद्ध लष्करी मोहिमेचे सात वेळा तेथे जाऊन वार्तांकन केलं आहे. ईशान्य भारतातील सशस्त्र बंडखोरी, पंजाबमधील ब्लू स्टार ऑपरेशन, कारगिलचे युद्ध आदी घडामोडींचं वार्तांकन त्यांनी केलं आहे. गेली चाळीस वर्षं ते संसदेच्या कामकाजाचं वार्तांकन करत आहेत. आफ्रिकेतील वसाहतवादाची सांगता झाल्यावर ‘सकाळ’च्या वतीनं दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन तेथील घटनांचं वार्तांकन करणारे पहिले ‘मराठी पत्रकार’ म्हणून त्यांना ओळखलं जात. विजय नाईक हे ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'चे माजी सदस्य, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे माजी सरचिटणीस, लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकारविषयक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष, ‘इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डन्ट्स’ या संस्थेचे विद्यमान निमंत्रक, दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटना व ‘कॉमनवेल्थ जर्नालिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष, दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेन्टर व हॅबिटॅट सेन्टरचे सदस्य अश्या विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.