सुलक्षणा महाजन
सुलक्षणा महाजन यांचा जन्म १९५१ साली मुंबई येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण नाशिक येथील गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये झालं. त्यांनी १९७२ साली सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई, येथून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमधील पदवी प्राप्त केली. शिवाय १९७४ साली आय.आय.टी. पवई येथून इंडस्ट्रियल डिझाइनमधे पदविका प्राप्त केली.
महाराष्ट्र नगररचना खातं, ठाणे आणि भाभा अॅसटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई, या सरकारी आस्थापनांमध्ये त्यांनी अर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स कन्सल्टंट, ठाणे या खाजगी क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये वास्तुरचनांसाठी कन्सल्टंट म्हणूनही त्यांनी काम केलं. ‘नगर नियोजन’ या विषयावर मिशिगन विद्यापीठात, तर ‘हॅबिटाट’ या जागतिक संस्थेच्या ‘सस्टेनेबल सिटीज प्रकल्पा’तर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास त्यांनी केला. ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट’मध्ये मुंबई संबंधीचे संशोधन त्या करत असून ‘विचार रचना संसद,’ प्रभादेवी, मुंबई, येथे पर्यावरण वास्तुरचना आणि नगर नियोजन या विषयाचं अध्ययन करत आहेत. या विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित असून त्या लोकसत्ता, सकाळ या दैनिकांतून सातत्याने लेखन करतात.