ल.सि. जाधव
‘होरपळकार’ म्हणून ल.सि. जाधव यांचं नाव महाराष्ट्राला सुपचिरित आहे. होरपळ हे त्यांचं पहिलं आत्मकथन खूप गाजलं आणि त्याचे चार भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यानंतर त्यांनी होरपळचा पुढचा भाग – ‘सूळकाटा’ या नावे लिहिला आणि त्यालाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. आत्मकथनाबरोबर त्यांनी कादंबरी, कविता लेखनही केलं. त्यांनी बालसाहित्याची निर्मितीही केली. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले.
वंचित समाजात जन्माला आल्यामुळे वाट्याला आलेलं दुःख, अवहेलना व झालेला अन्याय त्यांनी आपल्या लेखनातून संयतपणे मांडला. त्यामुळे त्यांचं लेखन आक्रस्ताळं न होता अंतर्मुख करणारं असतं. कायम लिहित्या असणाऱ्या या लेखकाचं जून २०१९मध्ये अकस्मात निधन झालं.