डॉ. लिली जोशी
डॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे.
याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.