बी.के.एस. अय्यंगार
बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.