पुनर्भेट : विस्मृतीत गेलेल्या नाटकांची
₹320.00
विजय तपास
अठराव्या शतकापासून मराठीजनांना नाट्यकलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यात संगीत नाटकांनी आपली एक विशेष जागा व्यापली आहे. विष्णुदास भावेंपासून ते अगदी आजपर्यंतच्या व्यावसायिक आणि प्रयोगशील नाटककारांपर्यंत अनेकांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचार, दृष्टिकोन विविध नाटकांमधून मांडलेले दिसतात. म्हणूनच, मराठी नाट्यभूमीच्या इतिहासात डोकावून बघणं, त्या नाटकांचा वेध घेणं महत्त्वाचं ठरतं. नाटकांमधून आपल्या समाजाचं चित्रण होतं; तत्कालीन समाजव्यवस्था, समाजातील त्या त्या वेळचे कळीचे प्रश्न यावर भाष्य केलेलं असल्याने या नाटकांना सामाजिक दस्तावेज म्हणून विशेषता लाभते.
पुस्तकाचे लेखक विजय तापस हे मराठी रंगभूमीचे अस्सल संशोधक-अभ्यासक म्हणून मराठी वाचकाला परिचित आहेत. पुस्तकातील सर्वच लेख अभ्यासपूर्ण आणि त्याच वेळी मनोरंजक व ज्ञानात भर घालणारे आहेत. १९१० ते १९५० या कालखंडातील विस्मृतीत गेलेल्या आणि केवळ गाजलेल्या अशा नव्हे, तर लक्षवेधी ठरलेल्या नाटकांचा मागोवा त्यांनी यात घेतला आहे. त्यात जाणवणारी अभ्यासाची सखोलता आणि विश्लेषणाची पद्धत तर विशेष दाद द्यावी अशीच ! नाटकाकडे पाहण्याची, त्यांचा अभ्यास करण्याची एक वेगळीच मांडणी तापस आपल्यासमोर पेश करतात. लेखात समाविष्ट केलेल्या नाटकाची थीम, त्यातील उल्लेखनीय प्रसंग, पात्र आणि त्यात डोकावणारे विचार हे सर्व तापस रंजकपणे सांगतातच, पण त्याचबरोबर नाटककाराची पार्श्वभूमी, त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं, त्यांची गाजलेली इतर नाटकं, ते विशिष्ट नाटक लिहिण्यामागचा त्यांचा विचार-भूमिका, त्या काळाची सामाजिक पार्श्वभूमी आणि प्रेक्षकांची नाटकाबाबतची प्रतिक्रिया याचाही ऊहापोह ते समर्थपणे करतात.म्हणूनच हे पुस्तक म्हणजे मराठी रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी तसंच नाट्यप्रेमी रसिकांसाठी मोलाचा ठेवा आणि सामाजिक दस्तावेज ठरावा,
विजय केंकरे (ज्येष्ठ रंगकर्मी)
Reviews
There are no reviews yet.