शिष्टाईचे इंद्रधनू

डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग


विजय नाईक यांचा जन्म १ जुलै, १९४५ रोजी अहमदनगर येथे झाला असून १९६७ साला पासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य आहे. सध्या ते ‘सकाळ पेपर्स’चे सल्लागार-संपादक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ‘दै. गोमंतक’ व त्यानंतर ‘सकाळ’चे दिल्लीतील वार्ताहर व ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजकीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन करण्यासाठी अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. भारतीय राजकारण, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी व शिष्टाई या विषयासंबंधी त्यांचं विशेष अध्ययन असून त्यावर त्याचं लिखाण सुरू असतं. १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धात ‘युद्धवार्ताहर’ म्हणून त्यांनी वार्तांकन केलं आहे. तसंच, त्यांनी ‘आयपीकेएफ’च्या श्रीलंकेतील तमिळ वाघांविरुद्ध लष्करी मोहिमेचे सात वेळा तेथे जाऊन वार्तांकन केलं आहे. ईशान्य भारतातील सशस्त्र बंडखोरी, पंजाबमधील ब्लू स्टार ऑपरेशन, कारगिलचे युद्ध आदी घडामोडींचं वार्तांकन त्यांनी केलं आहे. गेली चाळीस वर्षं ते संसदेच्या कामकाजाचं वार्तांकन करत आहेत. आफ्रिकेतील वसाहतवादाची सांगता झाल्यावर ‘सकाळ’च्या वतीनं दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन तेथील घटनांचं वार्तांकन करणारे पहिले ‘मराठी पत्रकार’ म्हणून त्यांना ओळखलं जात. विजय नाईक हे ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'चे माजी सदस्य, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे माजी सरचिटणीस, लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकारविषयक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष, ‘इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डन्ट्स’ या संस्थेचे विद्यमान निमंत्रक, दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटना व ‘कॉमनवेल्थ जर्नालिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष, दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेन्टर व हॅबिटॅट सेन्टरचे सदस्य अश्या विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

शिष्टाईचं अर्थात डिप्लोमसीचं विश्व म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनूच.
या विश्वाचे रंग, ढंग आणि विविध पैलू चार दशकांहून अधिक काळ दिल्लीत वास्तव्य असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत.
या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी किंवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाऱ्यांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे.
डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाऱ्या एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा कॅलिडोस्कोप म्हणजेच…शिष्टाईचे इंद्रधनू !


225.00 Add to cart

ग्रीकपुराण

कथा – महाकाव्य – शोकात्मिका


सुप्रिया सहस्रबुद्धे यांनी एम. ए., एम. फिल., पीएच. डी. (इंग्रजी), एम. ए. (इंडॉलॉजी) ही शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली आहे. मॉडर्न महाविद्यालय, पुणे येथे त्यांनी इंग्रजीच्या निवृत्त प्र-पाठक व विभाग प्रमुख म्हणून काम केलं आहे. त्यांनी मराठी, इंग्रजी, हिन्दी व संस्कृत भाषांमध्ये लेखन व अनुवाद केले आहेत. संत तुकाराम व जॉन डन यांच्या धार्मिक काव्याच्या तुलनेवर एम. फिल. व ग्रीक महाकाव्यं व महाभारत यांच्यातील स्त्रीव्यक्तिरेखांच्या तुलनात्मक अध्ययनावर पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. भारतीय स्त्रियांच्या इंग्रजीतील लेखनावर त्यांचे दोन लेखन प्रकल्प प्रकाशित झाले आहेत. तसंच त्यांची अनुवादित पुस्तकंही प्रकाशित आहेत.

ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे. पुढे ग्रीक पुराणकथांची वैशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा, अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फीयस व पॅन्डोरा सारख्या इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने साकारलेली महाकाव्यं, एस्किलस-सॉफोक्लिस-युरिपिडीस लिखित शोकांतिका यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आकांक्षा, तत्त्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे
अभिजात वाङमय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं. सर्जक कलावंताला आविष्काराची प्रेरणा देणाऱ्या, मानसशास्त्रज्ञाला मनाच्या कानाकोपऱ्याकडे बघायला प्रवृत्त करणाऱ्या आणि साहित्याच्या व इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहितीचा नवा खजिना उघडून देणारं रंजक असं…ग्रीकपुराण !


300.00 Add to cart

इति आदि

दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास


निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे. लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा. टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.

‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.

दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….

या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”


500.00 Add to cart