यांनी घडवलं सहस्रक (१००१ – २०००)
गेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्तींचा वेध…
संपादन :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर
‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.