उमेश झिरपे

उमेश झिरपे म्हणजे भारतात गिर्यारोहण क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या गिर्यारोहकांमधलं आघाडीचं नाव. एव्हरेस्ट मोहीम, अष्टहजारी शिखरांवरच्या मोहिमा, माउंट ल्होत्से, माउंट मकालू, माउंट चो ओयू, माउंट धौलागिरी, माउंट मनास्लू, माउंट कांचनजुंगा अशा अत्यंत आव्हानात्मक गिर्यारोहण मोहिमा त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली `गिरिप्रेमी'संस्थेच्या अनेक सदस्यांनी पूर्ण केल्या आहेत.माउंट प्रियदर्शनी, माउंट भ्रीग, माउंट मंदा, माउंट शिवलिंग, माउंट नून अशा अवघड शिखरांवरच्या मोहिमा त्यांनी स्वत: यशस्वीपणे केल्या आहेत. तर १९ हजार ६०० फूटांवरील माउंट थेलूवर त्यांनी एकट्याने चढाई केली आहे. निष्णात गिर्यारोहक असणारे उमेश झिरपे सुप्रसिद्ध लेखक व उत्तम वक्तेही आहेत. त्यांची या विषयावरची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग' या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने गिर्यारोहणातल्या त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवलं आहे.