गल्पेर बागान
बाणी बसू
अनुवाद : सुमती जोशी
बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर