सुमती जोशी

सुमती जोशी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४९चा. त्यांचं वास्तव्य मुंबई येथे आहे. दादरच्या आय.इ.एस. मुलींच्या शाळेतून त्या प्रथम क्रमांकाने एस.एस्सी. उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मायक्रोबायॉलॉजी या विषयात मुंबई विद्यापीठातून बी. एससी. केलं आहे. एन.टी.एस. च्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र या विषयाचं गेली एकवीस वर्षं अध्यापन करत आहेत. वयाच्या अठ्ठावनाव्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा शिकायला सुरुवात केली. दर वर्षी एक याप्रमाणे आद्य, मध्य आणि अंत्य या तीन परीक्षा विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या. शेवटच्या परीक्षेत म्हणजे वयाच्या साठीत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. २०१० सालापासून त्यांनी बंगाली साहित्याचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. आधुनिक बंगाली साहित्यातले गेल्या अर्धशतकातले उत्तम लेखक आणि त्यांच्या कलाकृतींचा आनंद मराठी वाचकांना घेता यावा हा त्यांचा अनुवाद करण्यामागील उद्देश आहे. आजपर्यंत त्यांनी अनुवादित केलेले अनेक कथा संग्रह, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. 'उत्क्रांती' या पुस्तकासाठी त्यांना विज्ञान विभागातला राज्य पुरस्कारही (२०१०) प्राप्त झाला आहे.