शुभदा पटवर्धन

रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर शुभदा पटवर्धन यांनी पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रम केला. त्यांनी पत्रकारितेतील करियरची सुरुवात मुक्त पत्रकारितेने केली आणि या काळात ‘टाईम्स ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘इव्हिनिंग न्यूज’, ‘माधुरी’ अशा विविध वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत विविध विषयांवर विपुल लिखाण केलं. पत्रकारितेतील तीस वर्षांच्या वाटचालीत संपादक, बातमीदारी, कॉपी रायटिंग, टेक्निकल एडिटिंग, टेक्निकल रायटिंग, भाषांतर, जनसंपर्क, सूत्रसंचालन आणि इव्हेंट मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलं. रेडिओ आणि टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन तसेच अनेक चर्चा, परिसंवादात भाग घेतला. लोकसत्तामधील एका तपाच्या कारकिर्दीत 'चतुरा' , 'लोकरंग' , 'लोकमुद्रा' , 'व्हिवा' , 'वास्तुरंग' अशा विविध पुरवण्यांचं काम करण्याची संधी मिळाली. त्यांची स्वलिखित तसंच अनुवादित पुस्तकं प्रकाशित असून सध्या त्यांनी स्वतःची 'विस्तार कम्युनिकेशन्स' ही संस्था स्थापन केली आहे. कन्टेन्ट डेव्हलपिंग तसंच अनुवाद आणि संपादन या क्षेत्रांतील कामांबरोबर त्या 'नेचर नट्स' हा निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित उपक्रमही राबवतात.