सतीश तांबे

मराठीतील महत्त्वाचे 'लिहिते लेखक' असलेल्या सतीश तांबे यांची कथालेखक व संपादक अशी वाचकांना ओळख आहे. वास्तव व कल्पना यांची सरमिसळ, सूक्ष्म विचार आणि चिंतन-मनन यांची बांधेसूद रचना म्हणजे त्यांच्या कथा असतात. म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांनी तांबे यांच्या कथांना ' नव (नव) कथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा' असं म्हटलं आहे. तांबे यांनी बीएस्सी केल्यानंतर एमए केलं. एमएला ते मराठी आणि सौंदर्यशास्त्र या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितांपासून झाली. नंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन व सदरलेखन केलं. त्यांची ' साप्ताहिक दिनांक'मधील 'मोकळीक' , तसेच 'आपलं महानगर' या सायंदैनिकातील 'हळक्षज्ञ' आणि 'लगोरी' ही सदरं विशेष गाजली. कथांसोबतच त्यांनी एकांकिका लेखन केलं आहे. तसेच विचक्षण संपादक म्हणूनही काम केलं आहे. 'आजचा चार्वाक' ( १९८९ ते १९९८) हा दिवाळी अंक आणि ‘अबब! हत्ती' (१९९१ ते १९९६) हे लहान मुलांचं मासिक यांच्या संपादनात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कथासंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले असून इतर महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत.