रस्किन बाँड

रस्किन बाँड या एक अँग्लो- इंडियन लेखकचा जन्म 19 मे १९34 रोजी कसौली इथे झाला. चार वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते आपल्या आजीच्या घरी, देहरादूनला गेले. वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यांनी पहिली लघुकथा लिहिली आणि त्याला पारितोषिकही मिळालं. तेव्हापासून त्यांची लेखणी अविरत साहित्यनिर्मिती करत राहिली. पुढे त्यांनी दोन वर्षांसाठी इंग्लंडला आपल्या मावशीकडे वास्तव्य केलं आणि तिथेच आपल्या पहिल्या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. या कादंबरीला वाचक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये लेखन केलं, तसंच काही नियतकालिकांचं संपादनही केलं. मोठ्यांबरोबरच लहान मुलांसाठीही भरपूर साहित्यनिर्मिती केली. आजवर त्यांच्या कथा - कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी चित्रपटही तयार केले आहेत. साहित्यातील भरीव योगदानासाठी त्यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार', तसंच 'पद्म भूषण पुरस्कार' यांसारखे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले आहेत.