मनोहर चंपानेरकर

मनोहर चंपानेरकर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1923 चा, तर त्यांचा मृत्यू 24 नोव्हेंबर 1992 रोजी झाला. मुंबई विद्यापीठाच्या आर्ट्स शाखेचे पदवीधर पुढे बी.एड. करून त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. एक नामांकित शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मनोहर चंपानेरकर यांनी शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे भरीव योगदान दिलं. त्यांनी लिहिलेली जवळजवळ दीडशे पुस्तकही त्या योगदानाचा भाग. त्याचप्रमाणे त्या काळात प्रतिष्ठा पावलेले एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशा 'मॅट्रिक' मासिकासाठी त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्षं गणित व इंग्रजी या विषयांवर मराठी व इंग्लिश माध्यमातून अखंडपणे लेखन केलं. इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात करू पाहणाऱ्या इच्छुकांसाठी विस्तृतपणे लिहिलेलं 'चंपानेरकर इंग्लिश कोर्स' हे पुस्तक त्यांच्या नावाजलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक होय. 1983 साली स्थापन झालेल्या 'रोहन प्रकाशन'चे ते सहसंस्थापक. रोहन प्रकाशनाच्या पायाभरणीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान मौल्यवान असंच आहे. रसिक मनोवृत्तीच्या मनोहर चंपानेरकर यांना चित्रकला व शास्त्रीय संगीत उत्तम प्रकारे अवगत होतं. 'दिलरुबा' या वाद्यांवर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं.