मेजर जन. शुभी सूद
मेजर जनरल (निवृत्त) शुभी सूद यांचा जन्म सिमला इथे झाला. त्यांचं बालपणही तिथेच गेलं. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अॅलकॅडमीमध्ये (एन.डी.ए.) प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना ८ गुरखा रायफलच्या ४ बटालियनमध्ये कमिशन मिळालं. या बटालियनमध्ये असताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातल्या ‘झांगर’ भागात केलेल्या कारवाईत भाग घेतला. मणिपूर आणि नागालँडमधल्या मोहिमेतही ते सहभागी झाले होते. सप्टेंबर १९६८ मध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल माणेकशा यांचे विशेष साहायक म्हणून नियुक्ती झाली. माणेकशा त्या वेळी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्करप्रमुख म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर माणेकशांनी सूद यांना विशेष मदतनीस म्हणून दिल्लीला नेलं.
त्या वेळी कॅप्टन असलेल्या सूद यांना १९७१च्या युद्धाच्या काही दिवस आधी बढती मिळाली व ते मेजर झाले. लष्करप्रमुखांचे डेप्युटी मिलिटरी असिस्टंट (DMA) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यामुळे १९७१च्या युद्धाच्या वेळच्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांना अगदी जवळून पाहता आल्या.
चेंबर्ले येथील स्टाफ कॉलेज कोर्ससाठी ते १९७२मध्ये इंग्लंडमध्ये गेले. नंतर ८व्या गुरखा रायफलच्या बटालियनचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ‘हायरकमांड’ आणि ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स’ हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील २६ इन्फन्ट्री डिव्हिजनचे कमांडर म्हणून करण्यात आली. १२ कोअरचे प्रमुख असताना ३१ मार्च १९९८ रोजी ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर जनरल सूद यांनी ‘ए.वी.आई.एस.टेंट ए कार' या कंपनीत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. २००३ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते लिखाणाकडे वळले. १९०४ मध्ये ल्हासा इथे असलेल्या कर्नल, सर एफ.ई. यंगहज्बंड यांच्या तिबेट मोहिमेविषयी सूद यांनी लिहिलेलं ‘यंगहज्बंड-ट्रबल्ड कॅपेन' हे पुस्तक डिसेंबर २००४ मध्ये प्रसिद्ध झालं.