गीता अय्यंगार
गीता अय्यंगार यांना योगशास्त्राचा मौल्यवान वारसा, त्यांचे वडील विश्वविख्यात योगतज्ज्ञ श्री. बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडून मिळाला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार हे आपल्या विशाल योगतत्त्वज्ञानाच्या कलात्मक आविष्कारासाठी सर्वश्रुत आहेत.
गीता अय्यंगार यांचा योगाभ्यासाचा प्रारंभ बालपणापासूनच झाला. १९६२ पासून त्या ‘योग’ हा विषय शिकवत आहेत. त्या ‘तत्त्वज्ञान’ व ‘आयुर्वेद’ या विषयातील पदवीधर आहेत. त्यांच्या योगविषयक ज्ञानाला मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोडीमुळे, त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करू शकतात. ‘रमामणि अय्यंगार मेमोरियल इन्स्टिट्युट’च्या त्या एक चालक होत्या. गीता अय्यंगार यांनी योगविषयाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी भारतात आणि विदेशात सर्वदूर प्रवास केलेला आहे. त्यांची या विषयावरील पुस्तकंही जगन्मान्य आहेत. या क्षेत्रात ज्या काही फार थोड्या स्त्रिया काम करू शकल्या त्या ‘योगशास्त्र’ विषयासंदर्भात त्यांचे नाव अतिशय आदराने व मानाने घेतलं जातं.
त्यांच्या ‘स्त्रियांसाठी योग-एक वरदान’ या पुस्तकाच्या मूळ इंग्रजी आवृत्तीचे, या पूर्वी युरोपातील सहा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. स्वत: एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आव्हानं, शारीरिक व मानसिक चढउतार हे त्या उत्तमरीत्या जाणू शकतात. स्त्रियांविषयी आंतरिक तळमळ असल्यामुळेच त्यांनी हे पुस्तक अतिशय तपशिलात लिहिलं आहे.