डॉ. प्रदीप तळवलकर

डॉ. प्रदीप गो. तळवलकर हे गेली तीस वर्षे ‘मधुमेहतज्ज्ञ’ म्हणून मुंबई शहरात व्यवसाय करत आहेत. सुरुवातीची वीस वर्षे इंटर्नल मेडिसिन आणि गेली दहा वर्षे मधुमेहावरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ते प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. विविध परिषदा, परिसंवाद यांत वक्ता म्हणून त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांनी पश्चिम भारतासह संपूर्ण भारतात विस्तृत प्रमाणावर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून पन्नासहून अधिक संशोधनपर लेख लिहिले आहेत. तसेच सामान्य जनता, फॅमिली डॉक्टर्स आणि तज्ज्ञांसाठी मधुमेहावर पुस्तके लिहिली आहेत. मधुमेहाबद्दल रुग्णांना शिक्षण देण्याच्या बाबतीत डॉ. तळवलकर अतिशय प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते प्रत्यक्ष आदान-प्रदान कार्यक्रमात, तसेच वृत्तपत्रे-नियतकालिके, रेडियो, दूरचित्रवाणी, वेब कॉन्फरन्सेस इत्यादी माध्यमांमधूनदेखील रुग्णांना आणि त्यांची शुश्रूषा करणाऱ्या नातेवाइकांना मधुमेहाबद्दल अद्ययावत माहिती मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. ‘एपीआय टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन'-(सहावी आवृत्ती) या पाठ्यपुस्तकाचे ते ‘साहाय्यक संपादक’ आहेत. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय असून भारतभर त्याचा फार मोठा वाचकवर्ग आहे. मधुमेहावरील विविध आंतरराष्ट्रीय परिषदांना उपास्थित राहण्याच्या निमित्ताने आणि मधुमेहासंबंधी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रांना निरीक्षकाच्या भूमिकेतून भेटी देण्याच्या निमित्ताने डॉ. तळवलकर यांनी जगभर प्रवास केला आहे. १९८८ साली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भरलेल्या इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या कॉन्फरन्सपासून या संघटनेच्या जगभर भरणाऱ्या सर्व कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी संशोधन सादर करून सक्रीय सहभाग घेतला आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध एस.एल.रहेजा या फोर्टीस असोसिएट रुग्णालयात, तसेच धन्वंतरी आणि शुश्रूषा या रुग्णालयात ते ‘मानद मधुमेह-तज्ज्ञ’ म्हणून काम पाहतात.