दीप्ती देवेंद्र

दीप्तीबद्दल... अभिनव कलामहाविद्यालयातून 'अप्लाईड आर्ट'मध्ये पदवी घेऊन पुढची दहा वर्ष दीप्तीने जाहिरातक्षेत्रात काम केलं. पुण्यातील अनेक डिझाइन स्टुडिओज् आणि अॅड एजन्सीजसोबत तिने काम केलं आहे. वेगवेगळ्या मासिकांसाठी तिने रेखाटनं आणि मुखपृष्ठं डिझाइन केली आहेत. काही वर्षांनी जाहिरात क्षेत्र पूर्णपणे सोडून ती मातीकामाकडे वळली. आज पुण्यात तिचा पॉटरी स्टुडिओ आहे. 'मृत्तिका' हा तिचा बँड असून ती हाताने मातीच्या वस्तू, शिल्पं बनवते आणि त्यांची विक्री करते. तिथेच ती पॉटरी शिकवतेही. काही डिझाइन इन्स्टिट्यूट्स आणि कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग पॉटरी फॅकल्टी म्हणूनही काम करते. काही मराठी आणि हिंदी फिल्म्ससाठी तिने कॉस्च्युम डिझाइनर आणि आर्ट डिरेक्टर म्हणूनही काम केलं आहे. नऊ वर्षांच्या मनवाची दीप्ती आई आहे. मूल वाढवणं आणि त्याच्यासोबत आपणही बदलत राहणं, वाढत राहणं ही फार आनंददायक गोष्ट आहे यावर तिचा विश्वास आहे. देवेंद्र गेल्यानंतर मनवा आणि तिच्यासारख्याच अनेक मुलांसाठी दीप्तीने 'मनू माऊ' हे पुस्तक लिहिलं. ज्यात मुलांना लहानपणीच 'मृत्यू' ही संकल्पना सहजपणे कशी समजावता येईल हे गोष्टरूपाने सांगण्याचा प्रयत्न तिने केला आहे.