बी.के. गर्दे
व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या भालचंद्र गर्दे यांनी नागपूरहून बी.एस्सी. व बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम.टेक. केलं. १९३९ साली त्यांनी ऑल इंडिया रेडिओ (आता आकाशवाणी) मध्ये नोकरी स्वीकारली. त्यातील तांत्रिक बाजूंच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत १९७४ मध्ये ते डेप्युटी चीफ इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले.
नोकरीच्या काळात त्यांच्या भारतभर बदल्या झाल्या. आकाशवाणीत नोकरी असल्यामुळे निरनिराळ्या राज्यांतील सुशिक्षित समाज, तेथील शैक्षणिक दर्जा यांची त्यांना जवळून ओळख झाली. काही काळ यु.पी.एस.सी.त संलग्न सभासद म्हणून व स्वतःच्या खात्याच्या अंतर्गत नेमणुका/प्रमोशन संबंधात त्यांनी ४००च्या वर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात चांगली बुद्धिमत्ता, विषयातील ज्ञान यात सरस असूनही मराठी मुले मागे पडतात, याचं कारण इंग्रजीत संवाद साधण्यात अपयश हे त्यांना दिसून आलं. या मुलांना मार्गदर्शन मिळावं या हेतूने गर्दे यांनी आपल्या इंग्रजी भाषेच्या व्यासंगातून जमवलेलं अनुभवजन्य विचारधन ‘इमप्रेसिव्ह इंग्लिश’ (Impressive English) या पुस्तकाच्या रूपाने वाचकांपुढे ठेवलं आहे.