अरुणा ढेरे
भारतीय संस्कृती , प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे या कन्या होत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली . लहानपणापासूनच वडिलांचा व्यासंगी श्वास लाभल्याने त्यानी समाजशास्त्र , मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास केला. तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली . दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व अभ्यासले.
१९८३ ते १९८८ या काळात, पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात अध्यापक - निर्माती म्हणून डॉ . अरुणा ढेरे यांनी काम केलं. १९८९ ते १९९ १ या काळात राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य विभागप्रमुख म्हणून कार्यरत आणि 'पसाय' या मासिकाची संपादिका म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्या पूर्णवेळ लेखन आणि संशोधनकार्य करत आहेत.
कवयित्री कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.