अरुण टिकेकर
निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे.
लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा.
टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.