अभिजित घोरपडे
अभिजित घोरपडे यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्र विषयातील पदवी घेतली. त्यानंतर आय.आय.टी.(मुंबई) मधील शिक्षण सोडून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. इंडॉलॉजी, पर्यावरण व शाश्वत विकास, हवामान बदल या विषयांचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे आणि हे विषय त्यांचे आस्थेचे आहेत. हवामान, पर्यावरण, पाणी, ग्लोबल वॉर्मिंग व शाश्वत विकास हे विषय सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने त्यांचे लेखन सुरू असतं. त्याद्वारे मराठी पत्रकारितेत पूर्वी अपवादानेच पाहायला मिळणारे हवामान-पर्यावरण यासारखे विषय केंद्रस्थानी आणण्यात त्यांचा ‘खारीचा वाटा’ आहे.
पत्रकारितेतील लेखनाबद्दल देशातील प्रतिष्ठेचा ‘रामनाथ गोएंका अॅ वॉर्ड फॉर एक्सलन्स इन जरनॅलिझम’ हा पुरस्कार त्यांना मिळाला असून इतरही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.
केवळ लिहूनच समाधान न मानता व्याख्याने, सादरीकरण, कार्यशाळा यांच्या माध्यमातून हे सर्व विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतात. याचबरोबर मुलांना अर्थातच वेगळ्या आणि रंजक पद्धतीने भूगोल शिकविण्याचा आनंद घेतात.