विलास मनोहर
विलास मनोहर (जन्म: १६ जुलै १९४४)
विलास मनोहर हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेली चार दशकं चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासीबहुल भागात कार्यरत आहेत. १९७५मध्ये आपल्या ऐन तारुण्यात पुण्यातील आपल्या सुस्थित जीवनाचा परित्याग करून ते सुप्रसिद्ध (दिवंगत) बाबा आमटे यांच्या समाजप्रकल्पांमध्ये दाखल झाले. तेव्हापासून तिथे झोकून देऊन कार्य करणारे विलास मनोहर आज वयाच्या ऐंशीव्या वर्षात दाखल होईस्तोवरही भामरागड येथील 'लोकबिरादरी प्रकल्पा'त आपल्या पत्नी रेणुका यांच्यासह कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.
दीर्घकाळ आदिवासींच्या सान्निध्यात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची उन्नती साधण्यासाठी कार्यरत असताना त्यांनी यापूर्वी तेथील जीवनावर आधारित अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 'एका नक्षलवाद्याचा जन्म' (श्रीविद्या प्रकाशन) या त्यांच्या पहिल्या कादंबरीनंतर प्रसिद्ध होत असलेला त्याचा दुसरा भाग म्हणजे 'नाकारलेला' ही कादंबरी.
त्यांची इतर प्रकाशित पुस्तकं... '
नेगल'- भाग १ (ग्रंथाली / १९९१)
'नेगल'- भाग २ (ग्रंथाली / १९९२)
'नारीभक्षक' (श्रीविद्या प्रकाशन / १९९८)
'मला न कळलेले बाबा' (मनोविकास प्रकाशन / २००४)