विजय तापस
प्रा. विजय तापस ह्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात तीस वर्ष मराठीचं अध्यापन केलं आहे. संतकविता, प्राचीन साहित्य, पोथीसाहित्य आणि जागतिक रंगभूमी या विषयांत त्यांना विशेष रस आहे. मराठी साहित्यसमीक्षक आणि मराठी नाट्यसमीक्षक म्हणून ते परिचित आहेत. ग्रंथसंपादक, भाषांतरकार, साहित्य-कला-संस्कृती क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक, जाहिरात लेखक, माहितीपटांचे लेखक या नात्याने त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे.
प्रा. विजय तापस यांना दस्तावेज निर्माण करण्यात आणि एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासात, संशोधनात विशेष रस आहे. त्यांनी रुईया महाविद्यालयाचा इतिहास लिहिला असून 'अमृतगाथा' या कॉ फीटेबल स्वरूपात तो प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी प्रमुख संशोधक म्हणून 'शहराचे भूषण' या मुंबई विद्यापीठातर्फे प्रकाशित झालेल्या प्रकाशनातही मोठं योगदान दिलं आहे. नाट्यकलावंत अरविंद देशपांडे, नाटककार विजय तेडुलकर आणि नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या ग्रंथांच्या निर्मितीत सहयोगी संपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या दुर्मीळ कवितांचं संपादन करणारे तापस यांचं 'गवसलेल्या कविता' हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून नावाजलं गेलं आहे.
विजय तापस यांनी 'लोकसत्ता', 'सामना' 'लोकमत', 'सकाळ' या वृत्तपत्रांतून साहित्य, समाज, संस्कृती आणि दुर्मीळ ग्रंथांशी संबंधित लेखन, स्तंभलेखन केलं आहे. 'सत्यकथा निवडक कविता' या दोन खंडात प्रकाशित झालेल्या प्रकल्पाचं आणि प्रा. श्री. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित झालेल्या 'सृजनव्रती श्री. पु. भागवत' या बृहग्रंथाचे विजय तापस हे सहयोगी संपादक आहेत.