श्रीकांत लागू
श्रीकांत लागू यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३५ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी रुपारेल महाविद्यालय, मुंबई येथून १९५९ साली बी.ए.(अर्थशास्त्र) ही पदवी प्राप्त केली आहे. व्यवसायाने ते ‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीचे संचालक होते.
मोबाईलचा शोध लागण्याच्या आधीपासून ‘माणसं जोडणं’ हे त्यांचं व्यसन होतं. कोणतीही गोष्ट पाहिली, वाचली किंवा भावली तर त्यात मित्रमंडळींना सहभागी करून आनंद वाटणं ही त्यांची वृत्ती होती. सागरसफरीत आनंद लुटणारं, आकाश निरीक्षणात गुंगून जाणारं व धरतीवरील गिरीशिखरं पादाक्रांत करण्याचा रोमहर्षक अनुभव घेणारं श्रीकांत लागू हे एक हा दिलदार–दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी रंगायन, अविष्कार व रुपवेध या संस्थांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘तुघलक’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या तसंच नभोवाणीवरील अनेक श्रुतिकांमध्येही त्यांचा सहभाग होता. विविध पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. त्यांच्या लेखांचे संग्रही प्रकाशित झाले.
2013 साली त्यांचं निधन झालं आणि मराठीतला एक कलंदर, हरहुन्नरी लेखक हरपला.