शरदिन्दु बंद्योपाध्याय

शरदिन्दु बंद्योपाध्याय यांचा जन्म ३० मार्च १८९९मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे झाला. त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९१९ साली प्रसिद्ध झाला. त्या वेळी ते कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील महाविद्यालयात शिकत होते. ते हॅरिसन रोड (आताचा महात्मा गांधी रोड) वरील एका मेसमध्ये राहात होते. मेसमधील त्यांची खोली हे व्योमकेश बक्षीचेही पहिले घर ठरले. कायदेशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर त्यांनी लेखनास वाहून घेतलं. पहिली व्योमकेश बक्षी कथा त्यांनी लिहिली ती १९३२ साली. तोवर ते नामवंत लेखक झालेले होते. १९३८ साली ते मुंबईला आले आणि 'बॉम्बे टॉकीज' व नंतर अन्य कंपन्यांसाठी पटकथा लेखन करू लागले. १९५२पर्यंत ते मुंबईत होते. मग पटकथालेखन त्यांनी थांबवलं आणि पुन्हा ललित लेखनाकडे वळण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी बंगालीत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा आणि बालकथा देखील लिहिल्या आहेत. उर्वरीत आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं आणि २२ सप्टेंबर १९७०मध्ये त्यांचं निधन झालं.