प्रफुल्ल कदम

विद्यार्थीदशेत राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या व शैक्षणिक प्रावीण्य असणाऱ्या प्रफुल्ल कदम यांना विद्यापीठ पातळीवरही वादविवाद , वक्तृत्व , प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष पारितोषिकं मिळाली आहेत. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय कार्याच्या हेतूने ग्रामपीठ चळवळीची सुरुवात त्यांनी केली. या चळवळीअंतर्गत विविध उपक्रम राबवले गेले. पाणी नियोजन हा त्यांचा अास्थेचा विषय असून महाराष्ट्र राज्याच्या पाणी नियोजनाची दिशा, सनियंत्रण, अंमलबजावणी, नियोजन यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री व विविध विभागाचे मान्यवर मंत्रीमहोदय यांचा समावेश असणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषद' या उच्चस्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसंच प्रतिकूल परिस्थितीमध्ये रचनात्मक व संघर्षात्मक कार्य करणाऱ्या देशातील एका तरुणाला दिला जाणारा 'सरिता - महेश समाजरचना ' हा राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते बी.जी. वर्गीस यांच्या हस्ते २००६ मध्ये दिल्ली येथे प्रदान करण्यात आला होता.