प्रफुल बिडवाई
"एक पत्रकार, राजकीय विश्लेषक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रफुल्ल बिडवई विख्यात होते. १९७२मध्ये 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली' 'या नियतकालिकातून एक स्तंभलेखक म्हणून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'बिझिनेस इंडिया', 'फायनान्शियल एक्स्प्रेस' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया' आदी मासिकांमधून व दैनिकांमधून काम केलं. 'हिंदुस्थान टाइम्स' , 'फ्रंटलाइन', 'रीडिफ.कॉम', आणि अन्य माध्यमांतूनही त्यांचे लेख नियमितपणे प्रकाशित होत असत. त्याचप्रमाणे, 'द गार्डियन', 'द न्यू स्टेट्समेन अँड सोसायटी' (लंडन), 'द नेशन', (न्यू यॉर्क), 'ल मोंद डिप्लोमॅटिक' (पॅरीस) आणि 'अल मॅनिफेस्टो' (रोम) आदी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधूनही त्यांचे लेख नियमितपणे प्रकाशित होत असत. जागतिक शांततेसाठी कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्ञात असलेल्या प्रफुल्ल बिडवई यांनी 'मूव्हमेंट इन इंडिया फॉर न्युक्लिअर डिसआर्मामेंट' ( MIND ) या संस्थेच्या स्थापनेसाठी मोलाचं साहाय्य केलं. 'इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ इंजिनीअर्स अँड सायन्टिस्ट्स अगेन्स्ट प्रोलिफरेशन 'या संस्थेचे ते सभासद होते आणि त्याचप्रमाणे, ते 'कोअलिशन फॉर न्युक्लीअर डिसआर्मामेंट अँड पीस, इंडिया' या संस्थेच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन तसंच सहलेखन केलेलं असून जागतिक पातळीवरील विविध परिषदांमध्ये भाग घेतला होता. डाव्या चळवळींचा मागोवा या पुस्तकात बिडवई यांनी तटस्थ व वस्तुनिष्ठपणे भारतातल्या डाव्या चळवळींची, त्यांच्या कार्याची चिकित्सा केलेली आहे. त्यातून त्याची अभ्यासू वृत्ती दिसून येते.
२३ जून, २०१५ रोजी अॅमस्टरडम येथील परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले असताना प्रफुल्ल बिडवई यांचं निधन झालं.