मृदुला दाढे जोशी
पं. गजाननबुवा जोशी, पं. एस.के. अभ्यंकर, पं. मधुकर जोशी, डॉ. आशा पारसनीस जोशी यांच्याकडे प्रा. डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं असून त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी (विशेष प्रावीण्यासहित) प्राप्त केली आहे. त्यानंतर संगीत विषयात एम.ए. करून त्या विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांनी ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयात एस.एन.डी.टी. विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली असून हिंदी चित्रपट गीतांची वैशिष्ट्यं सांगत, त्यांतील बारकावे उलगडून दाखवत गायनाचे सादर केलेले वैशिष्ट्यपूर्ण असे हजारो जाहीर कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
हिंदी चित्रपट गीतांवरचं त्यांचं लेखन केवळ गाण्याच्या चाली, शब्द एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तर त्यातलं ऑक्रेस्ट्रायझेशन, त्यातली वाद्यं, त्यांची वैशिष्ट्यं तसंच ते गाणं रचणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं हे त्या नेमकेपणाने उलगडून सांगतात आणि त्याकडे पाहण्याचा एक सखोल दृष्टिकोन देतात. त्या संगीताबरोबरच विविध विषयावरील पुस्तकांचं वाचन करत असल्यामुळे त्याचे संदर्भ त्यांच्या लेखनात लीलया येतात. सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत.