मोहनलाल भास्कर

'भारत छोडो' आंदोलन छेडलं गेलं त्या वर्षी, म्हणजे १९४२ साली, ३० नोव्हेंबर रोजी पंजाबच्या अबोहर तालुक्यात मोहनलाल यांचा जन्म झाला. इंग्रजी विषयात एम. ए. करून त्यांनी फिरोजपूर छावणीच्या 'एम. एल. एम. हायर सेकंडरी' शाळेत अध्यापन केलं. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात चौदा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगली. तुरुंगातून सुटल्यावरही उद्विग्न न होता कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी नव्या उमेदीने आयुष्याला सुरुवात केली. आयुष्याच्या दुसऱ्या अध्यायात समाजसेवा हेच आपलं उद्दिष्ट मानलं आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत 'मानव मंदिर सिनिअर सेकंडरी स्कूल'ची स्थापना केली. २००४ साली त्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि 'यह है प्यार का मौसम' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या आत्मकथेसाठी १९८९ साली त्यांना 'श्रीकांत वर्मा' पुरस्काराने गौरवण्यात आलं. २२ डिसेंबर २००४ रोजी त्यांचं निधन झालं.