माधव कौशिक
१ नोव्हेंबर १९५४ रोजी भिवनी (हरियाणा) येथे जन्मलेले माधव कौशिक हे हिंदी साहित्यविश्वातील बहुआयामी लेखक म्हणून ख्यातकीर्त आहेत. गझल, कविता, खंडकाव्य, कथा, समीक्षा, अनुवाद, बालसाहित्य, संपादन इत्यादी साहित्यप्रकारांत उल्लेखनीय लेखन, ‘आइने के शहर’, ‘किरण सुबह की’, ‘सपने खुली निगाहो के’, ‘अंगारों पर नंगे पाव’, ‘सारे सपने बागी है’ इत्यादी त्यांचे गझल संग्रह रसिकप्रिय. ‘सबसे मुश्किल मोड पर’, ‘एक अदद सपने की खातीर’ इत्यादी कवितासंग्रह प्रकाशित. ‘सुनो राधिका’, ‘लौट आओ पार्थ’, ‘मौसम खुले विकल्पो का’ इत्यादी खंडकाव्य ‘खिलौने मिट्टी के’, ‘आओ अंबर छू ले’ इत्यादी बाल वाचकांसाठी पुस्तके. इंग्रजी आणि पंजाबीतून काही अनुवाद, हरियाणवी, हिंदी कवितांचे संपादन कार्य. ‘ठीक उसी वक्त’, ‘रोशनवाली खिडकी’ कथासंग्रह… अशी त्यांची हिंदी साहित्यातील ग्रंथसंपदा सांगता येईल.
साहित्यविषयक उपक्रमांच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी परदेशातील जोहान्सबर्ग, शारजा, अबुधाबी, मेक्सिको इत्यादी शहरांना भेटी दिल्या आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गाचे जीवन आपल्या लेखनातून चितारतांना त्यातील माणूसपण अधोरेखित करणे, प्राक्कथांचा आधार घेत समकालीन विषयांना मुळापासून घुसळून काढणे, आपल्या अनुभवांच्या मांडणीकरिता विविध आणि चपखल अशा अभिव्यक्तीच्या वाटा शोधणे आणि त्यातून एक कवी, लेखक म्हणून आपले इप्सित उचलून घेणे ही लेखक म्हणून असलेली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण समजली जातात.
हरियाणा साहित्य अकादमीचा ‘बालमुकुंद गुप्त सन्मान’, ‘महाकवी सूरदास सन्मान’, पंजाबच्या भाषा विभागाद्वारे दिला जाणारा ‘शिरोमणी हिंदी साहित्य सन्मान’, ‘अखिल बलराज साहनी पुरस्कार’, केंद्रीय हिंदी साहित्य संस्थानचा ‘सुब्रह्मण्य भारती पुरस्कार’, हरियाणा साहित्य अकादमीचा ‘जीवनसाधना पुरस्कार’, प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलनाद्वारा ‘साहित्य वाचस्पती सन्मान’ इत्यादी महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. सध्या ते केंद्रीय साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत