माधव गडकरी

एक झुंझार पत्रकार, संपादक, सिद्धहस्त लेखक फर्डे वक्ते म्हणून माधव गडकरी यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला. राम नारायण रुईया महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन त्यांनी बी.ए. (ऑनर्स) केलं. शिक्षण पूर्ण केल्यावर, 1953 साली त्यांच्या संपादकत्वाखाली 'निर्धार' हे साप्ताहिक सुरू झालं. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या आकाशवाणीच्या मुख्यालयात संदर्भ व संशोधन अधिकारी म्हणून कामही पाहिलं. १९६२च्या सुरुवातीस 'टाइम्स ऑफ इंडिया' समूहाने मराठी वृत्तपत्र काढण्याचं ठरवलं, तेव्हा गडकरी यांची निवड मुख्य उपसंपादक म्हणून करण्यात आली. तिकडे पाच वर्षं काम केल्यावर 'दैनिक गोमंतक'चे संपादक झाले. २ एप्रिल १९८४ रोजी माधव गडकरी 'लोकसत्ता'चे संपादक म्हणून रुजू झाले आणि २४ सप्टेंबर १९९२ पर्यंत, म्हणजे सुमारे साडेआठ वर्षं ते संपादकपदी होते. या कारकीर्दीने त्यांच्या पत्रकारितेतील कार्यावर कळस चढवला. त्यांनी महाराष्ट्र तसेच विविध देशांतील भ्रमंतीवर विपुल लेखन केलं असून चरित्रलेखनही केलं आहे. याशिवाय त्यांच्या लेखांचे-अग्रलेखांचे खंडही प्रकाशित झाले आहेत.